अतिवृष्टी आणि रब्बी नुकसानीचे पैसे बाकी असलेल्या १० ते ११ लाख शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली; पुढील दोन ते चार दिवसांत निधी जमा होण्याची शक्यता.
उर्वरित अनुदानासाठी ६६३ कोटी रुपयांना मंजुरी
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी आणि रब्बी नुकसानीसाठी जी मदत जाहीर झाली होती, त्यातील निधी वाटपातील एक मोठा अडथळा आता दूर झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, राज्य सरकारने उर्वरित अनुदान वाटपासाठी ६६३ कोटी रुपयांना मंजुरी देण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांचे पैसे पहिल्या टप्प्यात तांत्रिक अडचणींमुळे आले नव्हते किंवा ज्यांची प्रोसेस अडकली होती, त्या सर्वांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील अंदाजे १० ते ११ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पैसे अडकण्याचे तांत्रिक कारण
सरकारने सुरुवातीला २० हजार कोटी रुपयांचा जीआर काढला होता, परंतु वाटप सुरू झाल्यावर काही तांत्रिक अडचणी आल्या. सरकारकडे अंदाजे ७०० ते ८०० कोटी रुपयांचा निधी शिल्लक होता, पण या निधीला वितरणाची प्रशासकीय मंजुरी (फाईल साईन) मिळाली नव्हती. त्यामुळे ज्यांच्या वाटपाचे बजेट होते त्यांना पैसे मिळाले, पण ज्यांचे नाव या उर्वरित यादीत होते त्यांचे पैसे मंत्रालयातून निधी रिलीज न झाल्यामुळे थांबले होते. आता ती फाईल क्लियर झाली आहे आणि निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.


















