मूग, उडीद, सोयाबीनसह अनेक पिकांचे काम अंतिम टप्प्यात; सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार.
पीकविमा वाटपाची तयारी अंतिम टप्प्यात
मागील खरीप हंगामात पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात जानेवारीपासून विमा संरक्षित रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे. पीकविमा योजनेअंतर्गत मागील खरीप हंगामातील पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन आणि कापूस या पिकांचा समावेश आहे. सध्या मूग आणि उडीद या पिकांचे कापणी प्रयोग संपून त्या पिकांच्या उत्पन्नाची माहिती शासनाला पाठविण्यात आली आहे. कांदा, तूर आणि मका या पिकांचे कापणी प्रयोग अंतिम टप्प्यात आहेत. बाकीच्या पिकांची माहिती डिसेंबरअखेर शासनाला पाठविली जाणार आहे.
नुकसानीचे प्रमाण निश्चित करण्याची प्रक्रिया
पीक कापणी प्रयोगानंतर त्या पिकांच्या आलेल्या उत्पन्नाची माहिती शासनाला पाठविण्यात आली आहे. पीक कापणी प्रयोगानंतर आलेले उत्पन्न (उंबरठा उत्पन्न) व मागील सात वर्षांतील चांगल्या पाच वर्षांतील उत्पन्नाची तुलना केली जाते. त्यातून सध्याच्या अपेक्षित उत्पन्नाची तुलना होऊन उंबरठा उत्पन्नानुसार जोखमेची रक्कम निश्चित होते. या माहितीनंतर अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न व मागील सात वर्षांतील उत्पन्नाची सरासरी यातून सध्याचे कमी आलेले उत्पन्न निश्चित होईल.

















