लागणीच्या उसापेक्षा खोडव्याचे उत्पादन अधिक मिळू शकते; खर्च ३५ ते ४० टक्क्यांनी कमी.
खोडवा आणि उत्पादन क्षमता
वैज्ञानिक दृष्ट्या खोडवा उसाचे उत्पादन हे लागणीच्या उसापेक्षा जास्त मिळते. मात्र, योग्य नियोजनाच्या अभावामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे उत्पादन घटते. खोडवा ऊस व्यवस्थापनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे लागण उसापेक्षा याचा खर्च ३५ ते ४० टक्क्यांनी कमी असतो. भरघोस उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे.
बुडख्याची छाटणी आणि व्यवस्थापन
चांगल्या उत्पादनासाठी खोडवा उसाचा डोळा जमिनीतूनच उगवणं गरजेचं असते. यासाठी ऊस तोडणी जमिनीलगत करावी. ऊस तोडणीनंतर जमिनीवर दोन-तीन कांड्या राहिल्यास खोडव्याची उगवण कमी होते आणि किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे ऊस तोडणी झाल्यावर बुडके जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटावेत, जेणेकरून उगवण जमिनीतून होईल आणि मुळे अन्नद्रव्य सहज शोषू शकतील. छाटणीनंतर, बुडख्यावर १ ग्रॅम कार्बेन्डाझिम (बुरशीनाशक) + ०.३६ ग्रॅम इमिडा क्लोप्रीड (कीटकनाशक) + १ लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
पाचटाचे आच्छादन (Trash Mulching)
शेतात राहिलेल्या पाचटाचे सर्व सऱ्यांमध्ये आच्छादन करावे. पाचटाचे आच्छादन केल्यास मातीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढतो, ज्यामुळे मातीची सुपीकता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पाचटाचे आच्छादन करताना वरंबे मोकळे राहतील याची काळजी घ्यावी, अन्यथा फुटवे कमी फुटतात. पाचट लवकर कुजवण्यासाठी हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि २.५ लिटर पाचट कुजवणारे जिवाणू वापरावेत.
बगला फोडणे (Stubble Breaking)
पहिल्या पिकाची मुळे जुनी आणि जीर्ण झालेली असल्याने ती चांगली काम करू शकत नाहीत. ही जुनी मुळे तोडण्यासाठी, तसेच जमीन भुसभुशीत आणि हवा खेळती ठेवण्यासाठी ऊस तुटून गेल्यानंतर आठ ते दहा दिवसांतच बगला फोडाव्यात. बगला फोडल्याने जुनी मुळे तुटून नवीन कार्यक्षम मुळांची वाढ होते, जी अन्नद्रव्य शोषून फुटव्यांना वाढीसाठी मदत करतात. बगला फोडल्यानंतर जमीन ६ ते ७ दिवस उन्हात तापू द्यावी. त्यानंतर वर खते देऊन दातेरी कुळव चालवावा आणि पाणी द्यावे.
नांग्या भरणे (Gap Filling)
उत्पादन चांगले मिळण्यासाठी एकरी ४० हजार ऊस असणे आवश्यक आहे. त्यामुळे तोडणीनंतर १५ ते २१ दिवसांच्या आत विरळ ऊस असलेल्या ठिकाणी नांग्या भरून घेणे फार गरजेचे आहे. नांग्या भरण्यासाठी दीड महिन्यांच्या रोपांचा वापर करावा. रोपांची वरची पाने हाताने न तोडता कात्रीने कापायची आहेत, तसेच वाढणारा शेंडा कापू नये. नांग्या भरल्यानंतर रोप जगेपर्यंत एकआड एक दिवस हलके पाणी द्यावे.



