गोठा व्यवस्थापन, ऊर्जायुक्त आहार, लसीकरण आणि जंत निर्मूलन आवश्यक; कोंबड्यांची मरतूक टाळण्यासाठी ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या.
थंडीचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम
थंडी वाढल्यामुळे केवळ स्वतःचीच नाही, तर आपल्या जनावरांची काळजी घेणेही फार गरजेचे आहे. ऋतू बदलामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो, जसे की दुधाचे उत्पादन कमी होते, त्यांची रोगप्रतिकारशक्ती (immunity) कमी होते किंवा कोंबड्यांमध्ये मरतूक वाढते. हे टाळण्यासाठी गोठा व्यवस्थापन, आहार आणि आरोग्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
गोठ्याचे योग्य व्यवस्थापन
जनावरांना थंडी वाजणार नाही, अशी गोठ्याची व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. गोठ्याला पडदे किंवा कव्हर लावून घ्यावेत किंवा खिडक्या व्यवस्थित बंद करून घ्याव्यात, जेणेकरून थंड वारा लागणार नाही. गोठ्यातील फरशी किंवा जमीन जास्त वेळ ओली राहणार नाही याची काळजी घ्यावी. लहान वासरे आणि करडे यांच्यावर थंडीचा जास्त परिणाम होत असल्याने, त्यांना रात्रीच्या वेळेस बंदिस्त ठिकाणी ठेवून थंडीपासून बचाव करावा, ज्यामुळे त्यांची मरतूक कमी होऊन वाढ चांगली होईल. जास्त थंडी असलेल्या भागात रात्रीच्या वेळी पिवळे बल्ब, हिटर किंवा ऊब देणारी साधने लावावीत. कोंबड्यांनाही ऊबदार ठेवण्यासाठी शेड बंद ठेवून ऊब देणारी साधने वापरावी. थंडीमध्ये डास, माशा आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यामुळे गोठ्यामध्ये नियमितपणे कीटकनाशकांची फवारणी करावी.
आहार आणि पाणी व्यवस्थापन
थंडीच्या दिवसात जनावरे जास्त पाणी पीत नाहीत. त्यामुळे त्यांना दिवसा उन्हात सोडावे किंवा उन्हात बांधून ठेवावे. यामुळे त्यांना व्हिटॅमिन डी३ मिळते आणि ते जास्त पाणी पितात. जास्त पाणी पिल्यामुळे चाऱ्याचे पचन चांगले होते आणि आरोग्य सुधारते. थंडीमध्ये ऊबदार राहण्यासाठी जनावरांची ऊर्जा जास्त खर्च होते, म्हणून या काळात त्यांना ऊर्जायुक्त खाद्य देणे फार गरजेचे आहे. दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन कमी होऊ नये यासाठी पशुखाद्य आणि खुराक, जसे की सरकी पेंड आणि शेंगदाणा पेंड, असे ऊर्जायुक्त खाद्य द्यावे. जनावरांना ओला चारा आणि सुका चारा हे दोन्ही संतुलित प्रमाणात देणे आवश्यक आहे.
जंत निर्मूलन आणि लसीकरण
थंडीमध्ये जनावरांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जंत निर्मूलन आणि लसीकरण तितकेच महत्त्वाचे आहे. कोणतेही लसीकरण करण्यापूर्वी जनावरांचे जंत निर्मूलन करणे गरजेचे आहे. यामुळे जनावरांच्या आतड्यातील जंत नष्ट होतात, खाल्लेले त्यांच्या अंगी लागते, दूध उत्पादनात वाढ होते आणि आरोग्य सुधारते. दर तीन महिन्यांतून लहान जनावरांपासून मोठ्या जनावरांचे जंत निर्मूलन पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करावे. थंडीमध्ये लाळ्या खुरकुर्द (FMD) रोगाचे विषाणू वाढतात. त्यामुळे गायी-म्हशींमध्ये लाळ्या खुरकुर्द रोगाचे, तर शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषार रोगाचे लसीकरण करावे. लसीकरणामुळे रोगाविरुद्ध प्रतिकार क्षमता वाढते. रोगांपासून बचाव करण्यासाठी महिन्यातून एकदा सात दिवसांसाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे द्यावीत.