उत्तर-पूर्वेकडील कोरड्या वाऱ्यांमुळे तापमान घसरले; जेऊर-करमाळ्यात पारा ५ अंश सेल्सिअसवर.
राज्यात थंडीची लाट सदृश्य स्थिती
महाराष्ट्र राज्यात सध्या कडाक्याच्या थंडीची लाट सदृश्य स्थिती कायम आहे. उत्तरेकडून किंवा उत्तर-पूर्वेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यातील सरासरी तापमान मोठ्या प्रमाणात घसरले आहे, त्यामुळे सर्वत्र कोरडे हवामान अनुभवायला मिळत आहे. आज, १२ डिसेंबर रोजी सर्वात कमी तापमान जेऊर करमाळा येथे ५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. तसेच, अहिल्यानगरमध्ये ७.३°C, नाशिकमध्ये ७.८°C, पुणे (शिवाजीनगर) मध्ये ८.३°C आणि जळगावमध्ये ६.९°C इतके तापमान होते.
उद्याही थंडी कायम राहणार
ज्याप्रमाणे आज राज्यात थंडी पाहायला मिळाली, तशीच थंडी उद्या (१३ डिसेंबर) सुद्धा राज्यात कायम राहील. तापमानात विशेष मोठा फरक होण्याची शक्यता नाही. उद्या सकाळसाठी हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये नाशिकचा घाटमाता, नाशिक पूर्व, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. इतर जिल्ह्यांमध्ये विशिष्ट इशारा नसला तरी, तिथेही कडाक्याची थंडी पाहायला मिळणार आहे.

















